जॅक निसटून गाडी छातीवर कोसळली; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0
353

माणदेश एक्सप्रेस न्यूज |  सातारा :

तेटली (ता. जावली) गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पंक्चर झालेल्या चारचाकीचे चाक बदलताना जॅक निसटल्यामुळे गाडी छातीवर कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाचे नाव प्रणय शंकर भोसले (वय २५, रा. तेटली, ता. जावली) असे असून तो गावात हॉटेल व्यवसाय करीत होता.


शनिवारी सकाळच्या सुमारास प्रणय याच्या चारचाकीला पंक्चर झाले होते. त्याने गाडीला जॅक लावून चाक बदलण्यास सुरुवात केली. मात्र गाडी आणखी उचलणे गरजेचे असल्याचे वाटल्याने प्रणय गाडीच्या खाली शिरून जॅक पुन्हा वर चढवू लागला. त्याचवेळी जॅक अचानक सटकून बाजूला पडला आणि गाडी थेट त्याच्या छातीवर कोसळली.


गाडी कोसळताच प्रणयच्या किंकाळ्या ऐकून त्याची पत्नी धावत आली. लगतच असलेल्या हॉटेलमधून वडीलदेखील धावले; मात्र त्यांनी गाडी उचलण्याचा प्रयत्न केला तरी ती हलली नाही. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना मदतीसाठी पाचारण केले. गावकऱ्यांच्या मदतीने प्रणयला बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. परंतु, तोवर उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


प्रणयचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्याच्या निधनामुळे पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडील आणि भाऊ यांच्यावरही मोठा आघात झाला आहे. नुकतेच व्यवसायात स्थिरावणारा, आनंदी स्वभावाचा प्रणय अशा अकाली निधनाने संपूर्ण तेटली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तेटलीत जमले. अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून प्रणयला अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here