
माणदेश एक्सप्रेस न्यूज
विटा : विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल (दि. २१) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेमुळे विटा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रमिला धोंडीराम तांबे (वय ६२, रा. शितोळे गल्ली, विटा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, जखमी झालेल्याचे नाव राजेंद्र तांबे असे असून ते मृत महिलेचे भाऊ आहेत.
काल दुपारी सुमारास तीन वाजता प्रमिला व राजेंद्र तांबे हे दुचाकीवरून सांगलीच्या दिशेने जात असताना मुरुमाने भरलेला डंपर (क्र. एम.एच. १२ एच.डी. ७९०३) अचानक भरधाव वेगाने मागून आला. या डंपरने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. धडकेत प्रमिला तांबे रस्त्यावर कोसळल्या आणि दुर्दैवाने डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडल्या. चालकाने गाडी न थांबवता पुढे नेल्याने प्रमिला तांबे यांना तब्बल ५० फूट फरपटत नेण्यात आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, राजेंद्र तांबे हे दुचाकीच्या विरुद्ध बाजूला पडल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतःच्या डोळ्यांसमोर बहिणीचा चिरडून मृत्यू झाल्याने त्यांनी हंबरडा फोडला.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकाश टोलू राठोड (वय ३२, रा. घुमटमाळ, विटा) असे चालकाचे नाव असून, हा डंपर अनिल दिलीप जाधव (रा. विटा) यांच्या मालकीचा असल्याचे आरटीओच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद करून पंचनामा सुरू करण्यात आला. भर चौकात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. विटा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.