
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत बंदिस्त पाईपलाईनच्या कामात गंभीर गैरप्रकार झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एका वितरिकेला साधारणतः ४० ते ५० हेक्टर क्षेत्रासाठी एक आउटलेट देण्यात येते, तर एका वितरिकेला एकूण पंचवीस आउटलेट्स असणे अपेक्षित असते. मात्र दिघची वितरिकेमध्ये प्रत्यक्षात काम न करता तब्बल २३ ठिकाणच्या आउटलेटचे बिल काढण्यात आल्याचा आरोप माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केला आहे.
पडळकर यांनी या प्रकरणावर जोरदार आवाज उठवत संबंधित अधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. “ज्या ठिकाणी एकही आउटलेट काढले गेले नाही, त्या ठिकाणचे एमबी (मोजमाप पुस्तिका) करून बिल कसे काढले गेले? आउटलेट आणि वॉलचे काम पूर्ण झाल्याशिवाय बिल मंजूर होऊच शकत नाही, मग हा प्रकार कसा घडला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत पडळकर यांनी अधिकारी शिवाजी पाटील, अभिनंदन हारगुडे आणि श्री डवरी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. “शेतकऱ्यांच्या नावावर योजनांचा निधी लाटण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नसल्याचे म्हणाले.
याचबरोबर त्यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत इशाराही दिला आहे. “दोन दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करून पूर्ण केले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना गाढवावर बसवून धिंड काढू,” असा आक्रमक इशारा पडळकर यांनी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे टेंभू योजनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित विभागाकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. जर आरोप सत्य ठरले, तर हा मोठा आर्थिक घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


