इंजि. राहुल ऐवळे यांना अश्रुपूर्ण निरोप ; नाझरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

0
1211

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : सांगोला तालुक्यातील नाझरे येथील तरुण, मेहनती आणि कुशल इंजिनिअर राहुल ऐवळे (रा. नाझरे, ता. सांगोला) यांचे काल (२१ जुलै) संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास वाटंबरे (ता. सांगोला) येथे महामार्गावर झालेल्या दुर्देवी अपघातात निधन झाले. ते आटपाडी परिसरात खाजगी मोजणीचे काम करत होते. त्यां जाण्याने संपूर्ण माणदेश हादरला आहे.

आज दिनांक २२ रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या मूळगावी नाझरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी नातेवाईक, मित्रमंडळी, मोजणी व्यावसायिक, शेतकरी बांधव आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते – हा उमदा, मनमिळावू आणि कार्यतत्पर तरुण इतक्या लवकर जाईल, हे कुणालाच पटत नव्हते.

राहुल ऐवळे यांनी त्यांच्या शेती मोजणीतील कौशल्याने अल्पावधीत मोठा मित्रपरिवार आणि विश्वास संपादन केला होता. अनेक गुंतागुंतीच्या मोजण्या त्यांनी अचूकतेने पूर्ण केल्या होत्या. त्यांच्या कामातला निष्ठा आणि सुसंवादामुळे ते शेतकरी वर्गात विशेष प्रिय होते.

त्यांचा माती सावरण्याचा कार्यक्रम उद्या, दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ८.०० वाजता नाझरे येथे होणार आहे. राहुलच्या अकाली निधनामुळे आटपाडी, सांगोला, नाझरे परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या आठवणी अनेकांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here