
माणदेश एक्सप्रेस न्यूज | तासगाव :
तासगाव-पाचवा मैल रस्त्यावर मंगळवारी (दि. ९) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आजी, आजोबा आणि नातवाचा जागीच व उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, मोटारीतील चार शिक्षक गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात शिवाजी बापू सुतार (५७), आशाताई शिवाजी सुतार (५५) आणि वैष्णव ईश्वर सुतार (५, सर्व रा. बुर्ली, ता. पलूस) यांचा मृत्यू झाला. तर, स्वाती अमित कोळी (३३, रा. सांगलीवाडी), पूजा राघवेंद्र कुलकर्णी (३९, रा. सांगली), सूरज बलराम पवार (रा. तानाजी चौक, मिरज) आणि किशोर लक्ष्मण माळी (रा. कवलापूर, ता. मिरज) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी शिवाजी सुतार हे पत्नी आशाताई आणि नातू वैष्णव यांच्यासह काकडवाडी (ता. मिरज) येथे नातेवाईकांकडे गेले होते. दुपारी ते दुचाकीवरून (एमएच १० बी ७१७४) परत बुर्लीकडे निघाले. दरम्यान तासगाव-कराड रस्त्यावर, राष्ट्रीय महामार्गालगत तोडकर मळ्याजवळ समोरून वेगात आलेल्या मोटारीने (एमएच १० इए ६५४०) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी जबर होती की, दुचाकीवरील तिघेजण रस्त्यालगत दहा फूट खोल खड्ड्यात फेकले गेले. मोटारदेखील त्याच खड्ड्यात कोसळून आदळली. यात शिवाजी सुतार यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी आशाताई आणि वैष्णव यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गंभीर जखमी स्वाती कोळी आणि पूजा कुलकर्णी यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, सूरज पवार आणि किशोर माळी यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. अपघातातील दोन्ही वाहनांचा चेंदामेदा झाला असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तासगाव पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी मृत शिवाजी सुतार यांचे पुतणे रमेश अरुण सुतार यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली असून मोटारचालक सूरज पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने बुर्ली गावात हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकला वैष्णव हा सुतार कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. जन्मदात्या आई-वडिलांसह एकुलता एक मुलगा गमावल्याने ईश्वर सुतार यांनी रुग्णालयाच्या आवारात हंबरडा फोडला.
अपघातग्रस्त मोटारीतील सर्वजण प्राथमिक शिक्षक आहेत. जखमी स्वाती कोळी यांना नुकताच ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला होता. त्यांचा कडेगाव येथे गुणगौरव सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वजण तासगावमार्गे सांगलीस परतत होते. दरम्यानच चालक सूरज पवार याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळी मिळाली.