
माणदेश एक्सप्रेस न्यूज | तासगाव :
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या अत्याचारामुळे सात महिन्यांची गरोदर राहिलेल्या १७ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान अकस्मात मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
सोमवारी (दि. ८) सकाळी पीडित मुलगी घरात असताना तिची प्रकृती अचानक बिघडली. ती अचानक बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तिची प्रकृती सतत बिघडत राहिल्याने तिला पुढील उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि. ९) सकाळी तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीत सात महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळेच ती गरोदर राहिल्याचे स्पष्ट झाले. अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बालक लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, नेमके कारण समजण्यासाठी वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, मुलीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.