“तनिषा भिसेंची हत्या झाली आहे, त्यामुळे आता सरकारने…”; सुप्रिया सुळेंचा आरोप

0
201

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी १० रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप होतो आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. दरम्यान हे प्रकरण म्हणजे तनिषा भिसे यांची हत्या आहे असा आरोप आता सुप्रिया सुळेंनी केला आहे. तसंच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

 

 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हीच मागणी करत होते. मी पाहिलं भाजपाच्या कार्यकर्त्यांची मागणीही हीच होती. या प्रकरणात कुठलंही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला आहे. सत्ताधाऱ्यांचे हाल होत असतील तर सामान्य माणसांचं काय? मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन गेल्यावरही मदत मिळत नसेल तर कुणाला न्याय मागायचा? या सरकारने याबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे. माणुसकी आहे की नाही? अत्यंत दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी ही घटना आहे. आमची सरकारकडून अपेक्षा आहे की आता अहवाल आला आहे आणि रुग्णालयाची चूक आहे हे दिसतं. तनिषा भिसेंची हत्या झाली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता काय दहा समित्यांचा अहवाल येईपर्यंत वाट बघणार का? असाही सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here