शरीराला उष्णतेचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होते? तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते शरीरासाठी अति उष्ण असे पदार्थ खाल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच उन्हामुळे,बदलत्या वातावरणामुळेही शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. अपचनाचा त्रास होतो. अनेक त्रास व्हायला लागतात. अशी दुखणी सहसा जात नाहीत. हैराण करून सोडतात. काहींच्या शरीर रचनेतच उष्णतेचे प्रमाण जास्त असते. अशांना तर सतत काही ना काही त्रास होत राहतात.
ही शरीरात वाढलेली उष्णता पाण्याच्या प्रवाहा प्रमाणे असते. जर पाण्याचा प्रवाह वाढला तर, तो वेगळी वाट काढून बाहेर पडतो. तसेच अंगातील वाढलेली उष्णता वेगळ्या मार्गांनी बाहेर पडते. मात्र ही उष्णता बाहेर पडताना त्रास फार देते. वेगवेगळे आजार, ऍलर्जी होतात. शरीरातील पित्त उलट्यांवाटे बाहेर पडते. शरीरावर ऍलर्जी उठून उष्णता बाहेर पडते. तसचं ज्यांना सतत उष्णतेचा आणि अपचनाचा त्रास होतो. अशांना सतत तोंड येते म्हणजेच माऊथ अल्सर होतो. याची कारणे वेगवेगळी आहेत.
माऊथ अल्सर का होतो?
१. शरीरातील उष्णता वाढल्यावर तोंडात उष्णतेचे फोड येतात.
२. अपचन झाल्याने माउथ अल्सर होतो. काही महिलांना पाळी दरम्यान अपचन होते. आणि मग माउथ अल्सरही होतो. त्याचे खरे कारण पाळी नसून पाळीच्या दिवसात होणारे अपचन आहे.
३. पित्ताचा त्रास अनेकांना असतो. अशा लोकांना सतत माउथ अल्सर होतो.
४. तोंडाची स्वच्छता नीट होत नसेल, तरी माउथ अल्सर होतो.
४. शरीरातील जीवनसत्त्व ‘बी१२’ कमी झाल्यास माउथ अल्सर होतो.
माउथ अल्सरवर घरगुती उपचार
१. कोथिंबीरीचा रस काढून घ्या आणि तो तोंडात धरून ठेवा. दिवसातून दोन- तीन वेळा असे करा. काही दिवसांत त्रासातून आराम मिळेल.
२. कोमट पाण्यात मीठ घाला. जास्त नाही थोडंसंच घाला. मीठ पाण्यानी चूळ भरा. गुळण्या करा. दिवसातून चार वेळा तरी करा. माउथ अल्सर बरा होईल.
३.पेरुच्या पानांचा रस माउथ अल्सर वर गुणकारी असतो. पेरुच्या पानांचा रस काढून तो तोंडात ठेवा. पेरुची पाने उकळा व त्या पाण्याच्या गुळण्या करा. किंवा ताजी स्वच्छ पेरुची पाने चावा. त्याचा निघणारा रस माउथ अल्सर नाहीसा करेल.
४. हळद मीठाच्या पाण्याने गुळण्या करा. हळद तोंड आलेल्या ठिकाणी लावली तरी चालेल.
५. तुळशीचा रस प्या. जिथे तोंड आलं आहे. त्या जागेवर रस धरू ठेवा.
६. बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या मेडिकलला मिळतात त्या खा.