
माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना भाजपा आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच आव्हान देत एकप्रकारे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता, डेअरिंग करा, असे आव्हान देताना मुनगंटीवार यांनी ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. तिजोरीत पैसे नाहीत म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सरकार शक्तिपीठ महामार्गाचे जोरदार समर्थन करत आहे. शक्तिपीठ करा, त्यासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. संजय गांधी निराधार योजना ऑनलाइन करण्याचे कुणाच्या सुपीक डोक्यात आले. चंद्रपूरधील या योजनेचे नोव्हेंबरनंतरचे पैसे आलेले नाहीत. कर्जमुक्तीची रक्कम २० हजार कोटी रुपये आहे. एका वर्षात आपण शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्तिवेतनात २९ हजार ८८१ कोटींची वाढ देतो. एकीकडे आपण ही वाढ देतो आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत ठोस निर्णय घेत नसल्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
यानंतर आता सुधीरभाऊ सत्तेत राहून आमचे काम हलके करत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार सत्तेत राहून आमचे काम हलके करता आहेत. सरकार आणि विरोधकांची समान मागणी आहे. सरकारने न घाबरता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. सुधीर भाऊ आमच्याबरोबर या, आम्ही सुधीरभाऊंसोबत लढा द्यायला तयार आहोत. त्यांनी रस्त्यावर उतरावे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.