
माणदेश एक्सप्रेस न्यूज|अहमदाबाद : १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया ड्रीमलाइनर विमान अपघाताच्या चौकशीत एक महत्त्वाची प्रगती झाली आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर त्यातील डेटा अखेर यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण काय होते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्या प्रयोगशाळेत या ब्लॅक बॉक्सचा सखोल तपास सुरू होता. २४ जून रोजी क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) यशस्वीरित्या काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्यातील मेमरी मॉड्यूलमध्ये प्रवेश करून डेटा मिळवण्यात यश आले आहे. सध्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) मधील माहितीचे विश्लेषण सुरू असून, याचा अहवाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.
२७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
हा अपघात देशातील सर्वात मोठ्या विमान दुर्घटनांपैकी एक मानला जातो. लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही सेकंदांतच कोसळले होते. हे विमान थेट बी.जे. मेडिकल कॉलेजच्या निवासी कॅम्पसमध्ये जाऊन आदळले. या भीषण दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि जमिनीवरील ३४ जण मिळून एकूण २७५ जणांचा मृत्यू झाला होता. केवळ एका प्रवाशाचा जीव वाचवण्यात यश आले.
अपघाताचे कारण लवकरच समोर येणार
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणांचा शोध घेणे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवणे हे तपासाचे उद्दिष्ट आहे. “सुरक्षित विमान वाहतुकीसाठी हे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे असून, जे काही निष्कर्ष पुढे येतील, त्यानुसार धोरणात्मक पावले उचलली जातील,” असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.