विधानसभेत तुफान राडा! अबू आझमी एकमताने निलंबित

0
311

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना निलंबित करण्यात आलं आहे. औरंगजेबसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अबू आझमींना निलंबित करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेमध्ये अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या विधानावरही कारवाई करण्याची मागणी केली. मात्र दोन्हीकडून आमदार आरडाओरड करु लागले आणि सभागृहामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.

 

 

 

याचदरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतलं. या आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर झाल्याचं जाहीर करत अबू आझमींचं निलंबनावर शिक्कामोर्तब केलं आहे. अबू आझमी यांना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही. अधिवेशन कालावधी संपेपर्यंत अबू आझमींवर विधानसभेच्या इमारतीच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

 

 

 

औरंगजेब एक महान राजा होता. त्याच्या काळात भारतात सुवर्णकाळ होता, असे विधान अबू आझमी यांनी केलं होतं. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. मुस्लिमांवर अत्याचार केले जात असल्याचेही ते म्हणाले होते.

 

 

‘अबू आझमी देशद्रोही, त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे’. अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आझमींवर विधानसभेत बोलताना निशाणा साधला. तसंच, ‘अबू आझमी यांना या सभागृहात बसण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून निलंबनाची कारवाई केली पाहिजे,’ अशी मागणीदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना केली. ‘छावा सिनेमा पाहा छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल केले. 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे. आपल्या राष्ट्रभक्तीचा अपमान आहे,’ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मागील तीन दिवसांपासून विधानसभेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर अबू आझमी यांच्याविरोधात दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here