
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात प्रवेशले आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा देत सांगितले की,
“आम्ही मराठ्याची औलाद आहोत… आता सुट्टी नाही! शनिवार-रविवारी वादळ येणार आणि सोमवारी मुंबई हादरणार.”
आझाद मैदानावर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत असले तरी ते ठाम आहेत.
त्यांनी स्पष्ट केले –
“सरकार कितीही प्रयत्न करेल, भीती दाखवेल, तरी आम्ही आझाद मैदानावरून हटणार नाही. आरक्षणाशिवाय आम्ही हलणार नाही.”
जरांगे यांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्याची दिशा दाखवताना सरकारला इशारा दिला –
शनिवार-रविवारी राज्यातील मराठा समाज मुंबईत दाखल होणार.
सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर मोठे वादळ निर्माण होईल.
“आझाद मैदानावर मेलो तरी चालेल पण हटणार नाही,” असे ते म्हणाले.
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट आरोप केले की,
“फडणवीस न्यायालयात खोटी माहिती देतात. सरकारला नासकी सवय लागली आहे. आम्ही न्यायासाठी लढतो आहोत. हैदराबाद आणि सातारा संस्थानचा गॅझेट आम्हाला पाहिजे.”
जरांगे यांनी सरकारला जाहीर इशारा दिला –
“वेशीवर मराठ्यांना अडवले तरी ते मुंबईत येतील.”
“सोमवारी मुंबईकर आणि मराठा यात फरकच कळणार नाही.”
“मराठे हुशार आहेत, कोणत्या मार्गाने मुंबईत शिरणार हे सरकारला कळणारही नाही.”
यातून सोमवारी आझाद मैदानावर आणि मुंबईत आंदोलकांची संख्या कित्येक पटीने वाढेल, असा संकेत मिळतो.
जरांगे पाटील यांनी सांगितले की, ते चर्चेला तयार आहेत, पण चर्चेला आले तर ३०-३५ मंत्री नकोत, दोन मंत्री आले तरी पुरेसे आहेत.
“आम्ही त्यांचा सन्मान करू. पण हैदराबाद व सातारा गॅझेटवर तुमची हरकत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.