आटपाडीत आज रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता रोको

0
979

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील साई मंदिर चौक, बसस्थानक, नगरपंचायत ते तहसील कार्यालयापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी आज, बुधवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जाणार आहे.

आटपाडी शहरातून पंढरपूर ते भिवघाट मार्गावरील या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. शालेय विद्यार्थी, विविध शासकीय कार्यालये आणि उपनगरांतून कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात वारंवार होत आहेत. वाहनधारक आणि नागरिकांचे हाल होत आहेत.

गेल्या वर्षी या रस्त्याचे रुंदीकरण, दोन्ही बाजूंनी बंदिस्त गटारासाठी २० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे; पण काम अद्याप सुरू झालेले नाही. रस्ते कामाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी रास्ता रोको केला जाणार आहे.

या रस्त्याच्या कामाबाबत, महेश पाटील, गणेश हाके, भारत सागर, खंडू ढोबळे, विकास डिगोळे, काकासाहेब जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत, पोलिस स्टेशन व तहसील कार्यालयाला निवेदन दिले आहे.