
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा मधु मित्र व मधु सखी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून 20 मे रोजी हा कार्यक्रम नाशिक येथे होणार असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
मधु मित्र पुरस्कारासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सचिन उगले व राजू मंडल (कोसबाड, डहाणू, पालघर) तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तेजा घोरपडे यांची मधु सखी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मधमाशी पालन करणाऱ्या मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने 2023 पासून ही योजना सुरु केली आहे. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि बसवंत हनी पार्क, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा हा कार्यक्रम योजण्यात आला आहे. २० मे रोजी बसवंत हनी पार्क, पिंपळगाव, नाशिक येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी काही उपस्थित मधपालाना उत्तेजनार्थ पुरस्कारही दिले जातील. या कार्यक्रमास अधिकाधिक मधपाळांनी व या विषयात रुची असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.