“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट निर्देश

0
34

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटानेही यासाठी कंबर कसली असून, मुंबईतील माजी नगरसेवकांसमवेत संवाद साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिले आहेत.

 

एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबईतील विविध पक्षांतून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवकांशी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी “सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागा. जागावाटपाची चर्चा टाळा आणि युतीतील मित्रपक्षांवर टीका करू नका,” असा स्पष्ट संदेश दिला.

 

या बैठकीत शिंदे यांनी मागील अडीच वर्षांत महायुती सरकारने केलेल्या विविध लोकोपयोगी कामांची माहिती दिली. रस्ते काँक्रीटीकरण, एसटीपी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, नवीन गृहनिर्माण धोरण, या सर्व बाबी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. मुंबईचे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून पुनर्निर्माण होत असून, नवीन गृहनिर्माण धोरणातून मुंबईकरांना परत आपल्या शहरात स्थायिक होता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

महायुतीतील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मित्रपक्षांबद्दल कोणतीही आक्षेपार्ह टीका टाळण्याच्या सूचना दिल्या. “जागावाटपाचा निर्णय तीन प्रमुख नेते मिळून घेतील, त्यामुळे याबाबत चर्चेत न पडता कामाला लागा,” असा सल्लाही त्यांनी दिला. युतीतील सलोखा टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे टाळा, असेही ते म्हणाले.

 

शिंदे गटाने मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीत चांगला परिणाम साधण्यासाठी आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात काम सुरू करून सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी जबाबदारी माजी नगरसेवकांना देण्यात आली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here