माणदेश एक्सप्रेस/मुंबई : भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन टी२० सामन्यात विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-०ने आघाडी घेतली. आज राजकोटच्या मैदानावर मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे.
भारतीय संघ सध्या चांगल्या लयीत आहेत. काही खेळाडू वगळता इतर सर्वच खेळाडूंचा फॉर्म चांगला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.सलग दोन पराभवानंतरही इंग्लंडने संघात कोणताही बदल केलेला नाही. पण भारताच्या काही खेळाडूंच्या स्थानाला धोका आहे. सामन्याची गरज व खेळपट्टीचा पोत पाहता संघात ३ बदल केले जाऊ शकतात.
टीम इंडियाचा नवखा फलंदाज ध्रुव जुरेल दुसऱ्या सामन्यात फारशी कमाल करू शकला नाही. त्याच्या जागी शिवम दुबेला संघात घेतल्यास फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीला थोडासा हातभार लागू शकेल.
सुंदरने दुसऱ्या टी२० मध्ये चांगली फलंदाजी केली, पण त्याला केवळ एकच षटक दिले गेले. अशा वेळी सुंदरपेक्षा जास्त अनुभवी रमणदीप सिंगला संघात संधी देऊन फलंदाजी भक्कम करता येऊ शकेल.
राजकोटची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. अशा वेळी रवी बिश्नोईच्या जागी अनुभवी मोहम्मद शमीचे बहुप्रतिक्षित पुनरागमन दिसू शकते. शमीच्या समावेशाने भारताची गोलंदाजी अधिक धारदार होईल.