
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | महाबळेश्वर :
पुण्यात बदली मिळत नाही, या कारणावरून महाबळेश्वर येथील एसटी वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी घडली. कर्मचाऱ्याच्या या टोकाच्या पावलामुळे महाबळेश्वर बसस्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली. आगारातील कर्मचाऱ्यांच्या समजूत काढण्याच्या प्रयत्नांमुळे अनुचित प्रकार टळला.
अशोक शंकर संकपाळ (वय ४४, रा. भोलावडे, ता. भोर, जि. पुणे) हे महाबळेश्वर आगारातील वर्कशॉपमध्ये कार्यरत आहेत. काही काळापासून ते पुण्यात बदलीसाठी सतत प्रयत्नशील होते. या संदर्भात त्यांनी महाबळेश्वर आगारात अर्ज देखील दाखल केला होता. मात्र, बदलीचे अधिकार सातारा येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाकडे असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांची बदली होत नव्हती.
संकपाळ यांनी या संदर्भात तक्रार व नोटीसही दिली होती. मात्र, त्यावरही कोणतीच कारवाई न झाल्याने ते अधिकच अस्वस्थ झाले. “माझी बदली झाली नाही, तर तीन तासांत आत्महत्या करतो,” असा इशारा देत त्यांनी लेखी अर्जही आगार प्रशासनाला दिला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते थेट महाबळेश्वर बसस्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर चढले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच आगारातील कर्मचारी, स्थानिक पोलीस आणि महाबळेश्वर नगरपालिकेचे अग्निशमन बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी रुग्णवाहिका देखील ठेवण्यात आली होती. पोलिस हवालदार संतोष शेलार यांनी संकपाळ यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगारातील एका कर्मचाऱ्याने समजूत काढत संकपाळ यांना सुरक्षित खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या प्रकारामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, बदलीच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दलही चर्चा रंगली. अनेक कर्मचाऱ्यांनी वेळेत बदली प्रक्रिया न झाल्याने वैयक्तिक अडचणी वाढत असल्याचे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत असून, संकपाळ यांच्यावर समुपदेशन करण्याची गरज असल्याचे अधिकारी मानत आहेत. दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून बदली प्रक्रियेबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणीही कर्मचाऱ्यांमधून होत आहे.


