प्रवास महागणार; दिवाळीसाठी एसटीने दिले १०% हंगामी भाडेवाढीचे चटके!

0
93

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :

दिवाळीचा सण जवळ आला की घराकडे परतणाऱ्या लाखो प्रवाशांची पावलं राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाडीकडे वळतात. या प्रवाशांना यंदा प्रवास खर्चाच्या स्वरुपात मोठा फटका बसणार आहे. एसटी महामंडळाने १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या २० दिवसांच्या कालावधीत तिकीट दरात १० टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. या वाढीमुळे लांब पल्याचा प्रवास सरासरी ९० ते १०० रुपयांनी महागणार असून एसटीच्या तिजोरीत जवळपास १००० ते ११०० कोटींचा महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे.


दरवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील दिवाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर प्रवासी गर्दी अपेक्षित आहे. धनत्रयोदशी यंदा १८ ऑक्टोबर रोजी आहे. यावेळी शाळांना सुट्ट्या लवकर लागल्याने प्रवाशांची संख्या काही दिवस आधीपासूनच वाढू लागणार आहे. त्यासाठी एसटीने १५ ऑक्टोबरपासून वाढीव बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील. गर्दी हाताळताना अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठीच ही हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.


कोणत्या गाड्यांवर भाडेवाढ?

ही तात्पुरती भाडेवाढ साध्या, जलद, निमआराम, शिवशाही आणि इतर गाड्यांवर लागू होणार आहे. मात्र, मुंबई-पुणे मार्गावरील ‘शिवनेरी’ गाड्यांवर भाडेवाढ लागू होणार नाही.


तिकीट दरातील बदल (प्रति टप्पा)

गाडीचा प्रकारसध्याचे दरदिवाळीत दर
साधी (मिडी, साधी)१०.०५ पैसे११.०५ पैसे
जलद१०.५ पैसे११.०५ पैसे
निमआराम१३.६५ पैसे१५ रुपये
साधी शयनआसनी१३.६५ पैसे१५ रुपये
साधी शयनयान१४.७५ पैसे१६.२५ पैसे
एसी शिवशाही (आसनी)१४.२० पैसे१५.६५ पैसे
एसी जनशिवनेरी (आसनी)१४.९० पैसे१६.४० पैसे

अंदाजित प्रवास खर्चातील वाढ

मार्गसध्याचे दरदिवाळीत दर
परळ–कोल्हापूर (साधी)₹६४०₹७००
मुंबई–मालवण (शिवशाही)₹१३००₹१४००
मुंबई–जळगाव (स्लीपर)₹११००₹१२५०
मुंबई–छ. संभाजीनगर (साधी)₹८००₹९००
मुंबई–सोलापूर (साधी)₹७५०₹८५०
मुंबई–जालना (साधी)₹८००₹९००
मुंबई–लातूर (साधी)₹९००₹१०००
मुंबई–सांगली (साधी)₹७३०₹८००
मुंबई–रत्नागिरी (साधी)₹६००₹७००

एसटी ही मध्यमवर्गीय आणि ग्रामीण प्रवाशांसाठी मुख्य प्रवास व्यवस्था आहे. त्यामुळे भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांवर ताण येणार आहे. मात्र, गर्दीच्या हंगामात जादा गाड्या सोडण्यासाठी आणि एसटीचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे अधिकारी सांगतात.


दिवाळीत आपल्या घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीचा प्रवास आता थोडा महाग होणार असला, तरी वाढीव गाड्यांमुळे ‘तिकीट मिळणार नाही’ ही चिंता काहीअंशी कमी होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here