
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : यंदाच्या आषाढी वारीत विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एक खास योजना जाहीर केली आहे. यामध्ये ४० किंवा त्याहून अधिक भाविकांनी ग्रुप तयार केल्यास त्यांना थेट त्यांच्या गावातून पंढरपूरपर्यंत ‘लालपरी’ म्हणजेच एसटी बसने सुलभ आणि स्वस्त प्रवास करता येणार आहे.
ही योजना राज्यात प्रथमच राबवली जात असून भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून ही सेवा बुक करता येणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
वारीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरकडे रवाना होतात. त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी यावर्षी एसटी महामंडळाने तब्बल ५,२०० विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक भाविकांना फायदा होणार आहे.
गर्दीचे नियंत्रण आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूरमध्ये चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना या चार ठिकाणी तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. वारीदरम्यान भाविकांसाठी पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि मार्गदर्शन फलक आदी सुविधा बस स्थानकांवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बिनतिकीट प्रवास रोखण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. त्याठिकाणी २०० सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. या सेवेमध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक योजना (७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास) आणि महिला सन्मान योजना (महिलांसाठी ५०% तिकीट सवलत) यासारख्या योजना लागू राहणार आहेत.
मागील वर्षी एसटीने आषाढी वारीसाठी ५,००० विशेष बसगाड्या सोडल्या होत्या. त्यातून सुमारे २१ लाख भाविकांनी प्रवास केला होता. यंदा हे प्रमाण वाढण्याची शक्यता असून एसटीने तयारीही त्यानुसार केली आहे.


