
माणदेश एक्सप्रेस न्यूज :- पुण्यातील खराडी पार्टी प्रकरणात अटक झालेल्या एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच गटांतर्गत वाद उफाळून आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खेवलकरांच्या मोबाईलमधून 252 अश्लील व्हिडीओ आणि तब्बल 1,497 अश्लील फोटो मिळाल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीशी असण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या आरोपांवरून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर प्रत्युत्तराचा बाण सोडला. यानंतर प्रांजल खेवलकरांचे सासरे असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी, “चाकणकर जास्तच चेकाळल्या आहेत” असे वादग्रस्त वक्तव्य करत पलटवार केला.
खडसेंच्या या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली. पक्षाने खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारत आणि शाईफेक करून निषेध व्यक्त केला. याशिवाय भाजपकडून शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, खडसेंनी भाजपच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त करताना पलटवार केला, “मानवी तस्करीच्या प्रकरणात नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण येत नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या संपूर्ण घडामोडीत प्रांजल खेवलकर प्रकरणाचा तपास पोलिस करत असताना, राजकीय नेत्यांच्या आरोप–प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण आता राजकीय रंग घेऊन अजित पवार गटाच्या अंतर्गत संघर्षात परिवर्तित झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या वादाला आणखी उधाण येण्याची चिन्हे आहेत.