“फिल्मी स्टाईल अपहरण आणि मारहाण…”भाजप कार्यकर्त्यावर अमानुष हल्ला… पडळकरांचा दावा खरा?”

0
265

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोलापूर – सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईलने अपहरण करून निर्घृण मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पडळकरांनी थेट हत्येचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला असून पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळेच कार्यकर्ता बचावल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शरणू हांडे असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून सध्या ते शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसेसह सहा साथीदारांना अटक केली आहे.

घटनाक्रम

शरणू हांडे यांच्या मते, ते पानटपरीजवळ उभे असताना अचानक एक MH-12 पासिंग गाडी आली. त्यातून उतरलेल्या सात जणांकडे कोयते, तलवारी आणि हॉकी स्टिकसारखी धारदार शस्त्रे होती. त्यांनी थेट हांडेंवर हल्ला चढवून त्यांना गाडीत ओढून नेले. गाडीतच मारहाण करत त्यांचे पाय बांधण्यात आले आणि त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू होता.

पडळकरांचा धडाकेबाज खुलासा

शरणू हांडेंची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले –

“हा फक्त मारहाणीचा प्रकार नव्हता, तर शरणूला पूर्ण संपवण्याचा कट होता. गाडीत बसवल्यानंतर त्याला मधल्या सीटखाली टाकलं, मांडीवर वार केला आणि टाके घालावे लागतील इतकी जखम झाली. त्यांच्याकडे हत्या करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य होतं. गाडीतल्या काही लोकांमध्ये ‘मारायचं की नाही’ यावरून वाद झाला आणि त्या वादामुळेच त्याचा जीव वाचला.”

पडळकरांनी पुढे सांगितले की, “पोलिसांनी तात्काळ यंत्रणा राबवली नसती तर शरणू जिवंत राहिला नसता. त्यामुळे मी पोलिसांचे विशेष अभिनंदन करतो. आरोपींच्या मागे कोण आहे, त्याचा शोध घ्यायलाच हवा.”

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे आरोपींवर नोंदवले असून त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपासही सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here