२४ तासांत तिघांनी घेतला गळफास; विवाहितेसह दोन तरुणांचा मृत्यू

0
374

माणदेश एक्सप्रेस न्युज | सोलापूर:

शहरात आत्महत्यांच्या घटना वाढत असल्याचे गंभीर चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. अवघ्या २४ तासांत तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यात एक विवाहितेसह दोन तरुणांचा समावेश असून, या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


भवानी पेठेतील मुकुंद नगर येथे राहणारी विशाखा सोनबा सदाफुले (वय २४) हिने बुधवारी (दि.१७) सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी फेट्याच्या सहाय्याने गळफास घेतला.
पती सोनबा सदाफुले यांनी तत्काळ तिला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र, उपचारापूर्वीच ती मृत घोषित झाली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.


त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता भवानी पेठ येथील राजीव गांधी नगरातील परमेश्वर ऊर्फ आकाश भारत ससाणे (वय २९) याने मावशी मंदाकिनी घोळसंगे यांच्या घरातील पत्र्याच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
भावाने व स्थानिकांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तो आधीच मयत झाल्याचे सांगितले.


मंगळवारी (दि.१६) संध्याकाळी जयमल्हार चौक, बुधवार पेठ येथील निलेश विकास भडकवाड (वय २५) याने राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
नातेवाइकांनी फौजदार चावडी पोलिसांच्या मदतीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


या तीनही घटनांची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. आत्महत्यांचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी, आर्थिक अडचणी, ताणतणाव किंवा कौटुंबिक कारणांमुळे या घटना घडत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शहरात वाढत्या आत्महत्यांच्या घटनांनी सामाजिक वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. मानसिक ताण, नैराश्य आणि कौटुंबिक संघर्ष यांचा वाढता दबाव नागरिकांवर पडत असल्याने अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी सामाजिक, शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here