
माणदेश एक्सप्रेस न्युज : सातारा : अभिनेता रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ‘राजा शिवाजी’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अपघात झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमातील डान्सर सौरभ शर्मा याचे निधन झाले आहे.
सिनेमाच्या शुटिंग सुरु असताना सौरभ गायब झाला. त्यानंतर दोन दिवसांनंतर सौरभ याचा मृतदेह नदीमध्ये आढळल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. सौरभच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सातारा जिल्ह्यातील संगम माहुली गावात सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. शूटिंगमध्ये, सौरभ शर्मा एक डान्सर म्हणून गाण्याचा एक भाग होता. गाण्यात वेगवेगळ्या रंगांचे गुलाल उधळले जात होते. गाण्याचं शुटिंग संपल्यावर तो कृष्णा नदीत हात धुण्यासाठी गेला. नदीच्या जोरदार प्रवाहाची जाणीव नसताना, त्याने पोहण्यासाठी नदीत उडी मारली आणि तो वाहून गेला.
दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह नदीत सापडला. या घटनेमुळे सिनेमाची शुटिंग सध्या थांबवण्यात आली आहे. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात रितेश Ritesh Deshmukh मुख्य भूमिकेत दिसणार आहे.