पिंपरी-नेहरूनगर येथे महापालिकेच्या वतीने शहरात प्राणी शुश्रूषा केंद्रात भटक्या आणि पाळीव प्राण्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणी शुश्रूषा केंद्राच्या माध्यमातून पाळीव, भटक्या श्वानांना उपचार दिले जातात. याच ठिकाणी श्वानांसाठी दहन यंत्र बसविण्यात आले आहे. मात्र, मोठ्या प्राण्यांसाठी अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते प्राणी पुण्यातील दहनयंत्रामध्ये पाठविण्यात येत होते. मात्र, आता शहरातील मोठ्या प्राण्यांसाठी दहनयंत्राची सोय करण्यात आली आहे. मोठ्या पाळीव प्राण्यांसाठीचे दहन मशीन बसविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. या मशीनमध्ये दहनासाठी प्राण्यांच्या वजनानुसार वेळ लागणार आहे. साधारण तीन तासांत मोठ्या प्राण्याचे दहन होईल, असे पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
एका वर्षात अडीच हजार श्वानांचे दहन
२०२३ मे ते एप्रिल २०२४ पर्यंत दोन हजार ५८० श्वानांचे दहन करण्यात आले. यामध्ये पाळीव आणि रस्त्यावरील श्वानांचा समावेश आहे. मे २०२३ मध्ये यंत्रामध्ये बिघाड झाल्याने श्वानांसाठीचे नवीन यंत्र बसविण्यात आले होते.
दरमहा ४० प्राण्यांचे दहन
शहरात पाळीव प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. दर महिन्याला साधारण ३५ ते ४० मोठे प्राणी दहनासाठी येतात. त्यामुळे ही संख्या मोठी असून शहरात अद्ययावत यंत्राची आवश्यकता होती. पाळीव प्राण्यांमध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा या प्राण्यांसाठीदेखील दहन यंत्र असावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार अद्ययावत आणि पर्यावरणपूरक यंत्र बसविण्यात आले आहे. हे मशीन सीएनजी गॅसवर चालते.
मोठ्या पाळीव प्राण्यांसाठीचे दहन यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची चाचणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत मोठ्या प्राण्यांचे दहन सुरू करण्यात येणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.