जन्मदात्या आईची एखादी मुलगी सुपारी देऊन हत्या करेल का? यावर विश्वास बसणे अवघड आहे. परंतु नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. मुलीस मोबाईल वापरण्यास निर्बंध आणल्यामुळे ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुलगी आणि तिचा मानलेल्या भावाला अटक करण्यात आली. प्रिया नाईक असे मृत आईचे नाव आहे. तर प्रणिता पाटील आणि निशांत पांडे या दोघांना हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकार
प्रणिता पाटील हिचा विवाह झालेला होता. परंतु तिचे पतीसोबत भांडण झाल्यामुळे ती माहेरी पनवेल येथे आईकडे निघून आली. दोन वर्षांपासून ती तिच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत पनवेलमध्ये राहत होती. या वेळी तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. परंतु तिच्याशी तिचे जमले नाही. तिची आई तिला फोनवर बोलण्यास नेहमी बंधने टाकत होती. तिच्या मोबाईलची तपासणी करत होती. त्यामुळे आईलाच संपवण्याचा निर्णय प्रणिता पाटील हिने घेतला.
मानलेल्या भावाला दिली सुपारी
प्रणिता पाटील हिने विवेक पाटील याला भाऊ मानले होते. विवेक पाटील याला पैशांची गरज होती. तो प्रणिताकडे पैसे मागत होता. मग प्रणिताने तू आईला संपवल्यावर १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. विवेक त्यासाठी तयार झाला. मग विवेक पाटील याने निशांत पांडे याच्या मदतीने १३ सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांची त्यांच्या घरात हत्या केली. रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक घरी आल्यावर त्यांना प्रिया बेशुद्ध दिसली. त्यांनी तिला त्वरीत रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
प्रिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले गेले. त्यावेळी त्यांची गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केली. पोलिसांनी प्रिया पाटील हिची चौकशी केली. त्यानंतर विवेक पाटील आणि निशांत पांडे यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे समोर आले.