ओडिशा राज्यातील बुर्ला येथील वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च च्या डॉक्टरांनी एक विचित्र शस्त्रक्रिया केली आहे. या धक्कादायक वैद्यकीय प्रकरणात डॉक्टरांनी दोन शस्त्रक्रिया करून एका महिलेच्या कवटीतून एकूण 77 सुया काढल्या आहेत. ही महिला जादूटोणा आणि मांत्रिकाची शिकार झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे पहिली शस्त्रक्रिया झाल्यानंतर शनिवारी फॉलो-अप शस्त्रक्रियेदरम्यान, न्यूरोसर्जनला तिच्या कवटीत पुन्हा अतिरिक्त सात सुया आढळल्या. ज्या काढून टाकण्यात आल्या.
पीडिता डॉक्टरांच्या निगराणीखाली
डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत, दोन शस्त्रक्रियांमध्ये महिलेच्या डोक्यातून 77 सुया काढण्यात आल्या आहेत. सुदैवाने, सुयांमुळे हाडांना कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु, तिच्या डोक्यावर सॉफ्ट टिश्यूच्या जखमा आहेत,” असे VIMSAR चे संचालक भाबग्रही रथ यांनी सांगितले. रुग्ण आमच्या निरीक्षणाखाली आहे आणि इतर समस्यां उद्भवू नयेत यासाठी तिची तपासणी केली जाईल. ज्यासाठी तिने मांत्रिकाला भेट दिली होती, रथ पुढे म्हणाले.
भाबग्रही रथ यांनी जोर देऊन बोलताना पुढे सांगितले की, महिलांच्या समस्या मानसिक आहेत असे मानने आणि त्यावर वेळीच उपाययोजना होणे आवश्यक असते. अन्यथा त्यात वाढ झाली आणि कुटुंबातील सदस्य विज्ञानवादी नसतील तर त्या मांत्रिकाच्या नादाला लागण्याची शक्यता अधिक राहते. वेदना आणि संसर्गाच्या कारणांमुळे बोलांगीरहून विमसार येथे रेफर करण्यात आलेली ही महिला आता धोक्याबाहेर आहे. परंतु शस्त्रक्रियेनंतर सुमारे एक आठवडा काळजी घ्यावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
बोलंगीरमधील इचगाव येथील रेश्मा बेहेरा (19) या पीडित महिलेला गुरुवारी तीव्र डोकेदुखीमुळे भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये तिच्या डोक्यात अनेक सुया आढळून आल्या. सुरुवातीला आठ सुया काढून टाकल्यानंतरही, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ज्यामुळे तिला VIMSAR कडे पाठवण्यात आले, जिथे अतिरिक्त 70 सुया काढण्यात आल्या. चार वर्षांपूर्वी तिच्या आईच्या मृत्यूनंतर रेश्मा वारंवार आजारी पडली होती आणि 2021 मध्ये तिने एका मांत्रिकाची मदत घेतली. रेश्माने वेदना होत असल्याची तक्रार केल्यावर कुटुंबाला तिच्या डोक्यात सुया सापडल्या. सुई टोचण्यासाठी जबाबदार असलेल्या फसव्या मांत्रिकाला अटक करण्यात आली असून, आरोपींकडून अशाच प्रकारची प्रथा आणखी काही पीडित आहेत का याचा तपास कांताबंजी पोलीस करत आहेत.