झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे रील बनवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाने 100 फूट उंचीवरून उडी मारल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढला.
पोलिसांनी मंगळवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. जिल्ह्यातील जिरावबारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करम डोंगराजवळ दगडखाणी आहे. येथे एक पाण्याचे तळे आहे. या ठिकाणी तौसिफ नावाचा तरुण आपल्या काही मित्रांसोबत आंघोळीसाठी आला होता. यादरम्यान त्याने सुमारे 100 फूट उंचीवरून खोल पाण्यात उडी मारली आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती पोलीस स्टेशन प्रभारी अनिश पांडे यांना मिळाली. तपासादरम्यान हा तरुण त्याच्या मित्रांसोबत रील बनवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्याने 100 फूट उंचीवरून उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला.