धक्कादायक! रात्री झोपेत चालताना तरुणाचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू; मुंबई येथील घटना

0
29

मुंबई येथील भायखळा परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाला झोपेत चालण्याची सवय होती. रात्रीच्या वेळी घरात झोपेत असतानाच तो चालू लागला. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन चालता चालता खाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असं या मृत तरुणाचं नाव आहे. जखमी अवस्थेत असलेल्या मुस्तफा याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तेथे उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले.

सहाव्या मजल्यावरुन तिसऱ्या मजल्यावर पडला
मुस्तफा चुनावाला आणि त्याचे कुटुंबीय मुंबई येथील भायखळा पोलीस स्टेशन हद्दीत बहुमजली इमारतीत वास्तव्यास आहे. त्यात हे कुटुंब सहाव्या मजल्यावर राहते. त्याला झोपेमध्ये चालण्याची सवय होती. मुस्तफा हा काल म्हणजेच 30 जून रोजीही तो आपल्या कुटुंबीयांसोबत घरामध्ये झोपला होता. दरम्यान, रात्रीच्या वेळी तो झोपेत अचानक चालू लागला. चालता चालता तो सहव्या मजल्यावरुन खाली थेट तिसऱ्या मजल्याच्या गच्चीत पडला. झालेल्या आवाजामुळे कुटुंबीय आणि तिसऱ्या मजल्यावरुल लोक जागे झाले. त्यांनी मुस्तफा यास वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

उपचारांपूर्वीच मृत्यू
भायखळा पोलिसांनी आपल्या दप्तरी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा यास झोपेत चालण्याची सवय असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घटना घडली तेव्हाही तो झोपेतच चालत होता. ज्यामुळ अपघात होऊन त्याचा बळी गेला. प्राप्त माहितीनुसार, चुनावाला कुटुंबीय टॉवर नंबर 1, नेसबीट रोड, माझगाव येथे राहाते. प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
झोपेत चालणे हा प्रकार काय आहे?

स्लीपवॉकिंग (झोपेत चालणे) हा एक झोपेचा विकार आहे. ज्यामुळे तुम्ही झोपेत असताना फिरू शकता किंवा असामान्य किंवा अनपेक्षित कृतीमध्ये व्यग्र राहता. असा प्रकार अनेक कुटुंबामध्ये काही व्यक्तींमध्ये आढळतो आणि बहुतेक लोक त्याच वातावरणात वाढतात. स्लीपवॉकिंगचे औपचारिक नाव सोमॅम्ब्युलिझम आहे, जे लॅटिन शब्दांपासून आले आहे ज्याचा अर्थ “झोप” आणि “चालणे” असा होतो. तज्ञ त्याला झोपेचा विकार (पॅरासोम्निया) म्हणून वर्गीकृत करतात. स्लीपवॉकिंगचे नेमके कारण अजून तरी स्पष्ट झाले नाही. परंतू, अशा प्रकारातील लोक झोपेमध्ये चालू शकतात. ते चालताना तम्ही त्यांना पाहू शकता. तुमच्या जवळच्या कुटुंबातील इतर सदस्यांना झोपेत चालण्याची वर्तणूक किंवा रात्रीची भीती असल्यास तुम्ही स्लीपवॉक करण्याची अधिक शक्यता असते, असेही सांगितले जाते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here