
पन्हाळा | माणदेश एक्सप्रेस न्यूज
शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही “पन्हाळा-पावनखिंड मोहीम” राबविण्यात आली. मात्र यंदा या मोहिमेला एक वेगळीच सामाजिक दिशा लाभली. मोहिमेच्या माध्यमातून पन्हाळा व परिसरातील गरजू, अनाथ व निराधार ४२ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट ही संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले आणि अनाथ बालकांसाठी काम करत असून, शिक्षण व जगण्याची संधी वंचितांपर्यंत पोहचवण्याचा ध्यास घेतली आहे. यंदाची मोहीम नेबापूर गाव व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गरजूंना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आली.
या मदत वाटप प्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी, तसेच अभिषेक बहिरट, ओमनाथ जाधव, आनंद पवार, योगेश भारती, राहुल पाटील, अभिजीत मोहोळकर, अमित कुरणे आदी मान्यवर व स्वयंसेवक उपस्थित होते.
“कोणीही अनाथ किंवा शिक्षणापासून वंचित राहू नये!” – यशवंत गोसावी
“पन्हाळा-पावनखिंड ही शौर्यभूमी आहे. या मातीत जन्मलेल्या कोणत्याही मुलाला अनाथतेची किंवा शिक्षणाअभावी दु:खाची छाया पडू नये, ही आमची संकल्पना आहे. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या भागात सातत्याने मदतीचा हात पुढे करत आलो आहोत. आणि ही मदत इथून पुढेही अविरत सुरूच राहील.”
— यशवंत गोसावी, अध्यक्ष, शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट, पुणे
ट्रस्टचा उद्देश केवळ मदत पुरवणे नसून, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे आहे. ‘शिवनिश्चल’चा हा सेवायज्ञ महाराष्ट्रातील इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.