
माणदेश एक्सप्रेस न्यूज
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री रेळेकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव असून ती मूळची सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील आहे. या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
गायत्री रेळेकर ही विद्यार्थिनी भूगोल विभागात पहिल्या वर्षात शिकत होती. गावावरुन परतल्यानंतर गायत्रीने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर शिवाजी विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईक तसेच गायत्रीच्या मैत्रिणींचा वसतिगृहासमोरचा आक्रोश हा हदय पिळवटून टाकणारा होता.
गायत्री रेळेकर ही विद्यापीठातीली मुलींच्या वसतिगृहातील रुम नंबर 54 मध्ये राहत होती. तिच्यासोबत इतर दोन मुलीही राहत होत्या. गायत्री ही तीन दिवस तिच्या गावी गेली होती. 11 ऑगस्ट रोजी सकाळी ती सांगलीवरून कोल्हापूरमध्ये पोहोचली. तसा फोन तिने तिच्या वडिलांना केला. त्यानंतर ती विद्यापीठातील वसतिगृहामध्ये पोहोचली.
दुपारच्या सुमारास गायत्रीच्या मैत्रिणी वसतिगृहामध्ये पोहोचल्या. त्यावेळी गायत्रीच्या रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्या मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. फोन केल्यानंतर रिंग वाजत होती, पण तो उचलला नाही. त्यावर शंका आल्याने त्या मैत्रिणींनी खिडकीतून डोकावल्यानंतर त्यांना धक्काच बसला. रुमच्या आतमध्ये गायत्रीने आपल्या ओढणीने गळफास लावून घेतला होता.
या घटनेची माहिती त्या मैत्रिणींनी तात्काळ हॉलस्टेल्या रेक्टर आणि सुरक्षारक्षकांना दिली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. नंतर या घटनेची माहिती राजारामपुरी पोलीस स्टेशनला कळवण्यात आली.