शिवसेनेचा उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला ठाम पाठिंबा – एकनाथ शिंदे

0
12

माणदेश एक्सप्रेस न्यूज | दिल्ली

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) शिवसेनेचा ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीतील गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “अमित शाह हे देशाच्या इतिहासातील सलग २,२५८ दिवस सेवा देणारे पहिले गृहमंत्री ठरले आहेत. 370 कलम रद्द करून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. देशातील दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.”

शिवसेना नेहमीपासून एनडीएसोबत असून भाजपसोबतचा युतीचा वारसा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आहे, असे सांगत शिंदे म्हणाले, “एनडीए स्थापन होण्यापूर्वीपासून आमचं एकमेकांवर विश्वास आहे. आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीतही आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणून लढणार आहोत.”

दरम्यान, माधुरी हत्तीणी प्रकरणावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असून या याचिकेत वनतारा संस्थेला पक्षकार म्हणून घेतलं जाणार आहे. जनभावना लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल,” असं ते म्हणाले.

“आम्ही लपूनछपून काही करत नाही. अधिवेशनादरम्यान आम्ही सर्व खासदारांना भेटत आहोत,” असा टोलाही शिंदे यांनी विरोधकांना लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here