
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीपुढे मोठं राजकीय आव्हान उभं राहत असून, काँग्रेसला जबरदस्त धक्का बसण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
सिद्धाराम म्हेत्रे यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या इनकमिंगमुळे काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठी पोकळी जाणवण्याची शक्यता आहे.
शिवसेना (शिंदे गट) पश्चिम महाराष्ट्रातील आपला गड बळकट करण्याच्या तयारीत असून, सोलापूरमधील हा प्रवेश त्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना हे राजकीय घडामोडी महाविकास आघाडीला अडचणीत टाकणाऱ्या ठरत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर महानगरपालिका, तसेच बार्शी, पंढरपूर, अकलूज, करमाळा, कुर्डुवाडी, मंगळवेढा, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ, सांगोला या 11 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस वाढताना दिसत आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचाराची रणनिती सध्या ऐरणीवर आहे. म्हेत्रे यांच्या संभाव्य प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली असून, पक्ष संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.