
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हाणामारीत दोन्ही गटांनी एकमेकांवर शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. घटनेनंतर शिक्रापूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जातेगाव बुद्रुक येथील विलास यशवंत उमाप (वय 57) हे त्यांच्या कुटुंबीयांसह वडिलोपार्जित जमिनीची खासगी मोजणी करत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या जमिनीला सीमारेषा दाखवण्यासाठी चिरे लावण्यास सुरुवात केली.
दरम्यान, याच जमिनीवर हक्क सांगणारे संभाजी तानाजी उमाप (वय 46) आपल्या कुटुंबीयांसह तेथे आले. त्यांनी जमिनीची मोजणी करण्यास विरोध केला. त्यातून दोन्ही गटांमध्ये वाद वाढत गेला. काही वेळातच हा वाद तीव्र झाला व दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.
या प्रकरणी विलास यशवंत उमाप आणि संभाजी तानाजी उमाप यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी त्यानुसार दोन्ही गटांतील महिलांसह 14 जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेत संभाजी तानाजी उमाप, तानाजी किसन उमाप, शुभम तानाजी उमाप, पोपट किसन उमाप, संगीता संभाजी उमाप, विलास यशवंत उमाप, आनंदा हौशीराम उमाप, महेंद्र गुलाब उमाप, अजित गुलाब उमाप, यश आनंदा उमाप, शिल्पा आनंद उमाप, सुमन गुलाब उमाप, सपना महेश उमाप आणि ललिता विलास उमाप (सर्व रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार बापू हाडगळे आणि विश्वांबर वाघमारे करत आहेत. दोन्ही गटांत झालेल्या हाणामारीमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, जमिनीच्या वादातून पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या वादाची तीव्रता स्पष्ट झाली आहे.