
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे
पुणे शहरातील नागरिकांना हादरवून टाकणाऱ्या एका धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. कात्रज परिसरातून दोन वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिला भीक मागण्यासाठी लावणाऱ्या टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी यशस्वी छडा लावत पर्दाफाश केला. या टोळीत पाच जणांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांना तुळजापूर (धाराशिव) येथून अटक केली आहे. चिमुरडीची सुखरूप सुटका करण्यात आली असून, सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
मुलगी गायब… आणि पोलिसांची धावपळ सुरु
ही घटना २५ जुलैच्या मध्यरात्री घडली. धनसिंग हनुमंत काळे (वय २५) हे आपल्या पत्नी व चार मुलांसह कात्रजमधील वंडरसिटीजवळ झोपडीवजा घरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या दोन वर्षांच्या जुळ्या मुलींमधील एक अचानक मध्यरात्री बेपत्ता झाली. सकाळी जाग आल्यानंतर मुलगी सापडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
140 सीसीटीव्ही फुटेज खंगाळली, रेल्वेस्थानकापर्यंत शोध
तक्रार दाखल होताच पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. वंडरसिटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकीवर तीन अनोळखी व्यक्ती त्या चिमुरडीला घेऊन जाताना दिसले. यानंतर पोलिसांनी कात्रजपासून ते पुणे रेल्वे स्थानकापर्यंतचे तब्बल 140 सीसीटीव्ही फुटेज तपासले. रेल्वे स्थानकात या टोळीत आणखी दोन जण असल्याचे निदर्शनास आले. आरोपींची ओळख पटवताच ते सर्वजण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
चिमुरडीला मिळाले, आरोपी गजाआड
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन करून तुळजापूर येथे धाड टाकली. त्यावेळी तीन आरोपी ताब्यात घेतले गेले. त्यांच्याकडे असलेली दोन वर्षांची चिमुरडी सुखरूप आढळून आली. यानंतर आणखी दोन आरोपींनाही अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
१) सुनील सिताराम भोसले (वय 51)
2) शंकर उजण्या पवार (वय 50)
3) शालुबाई प्रकाश काळे (वय 45)
4) गणेश बाबू पवार (वय 35)
5) मंगल हरफुल काळे (वय 19)
ही टोळी भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यातील एका महिलेसह सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, पुणे न्यायालयाने त्यांना 2 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांचे सतर्क आणि कौशल्यपूर्ण तपास कौतुकास्पद
या संपूर्ण तपासात भारती विद्यापीठ पोलिसांनी दाखवलेले तत्परता, तांत्रिक साधनांचा वापर आणि मानवी समज यामुळेच केवळ दोन दिवसांत मुलीचा शोध लागला आणि एक मोठा गुन्हेगारी जाळं उघडकीस आले. पुणे पोलिसांचे कौतुक होत आहे.