
माणदेश एक्सप्रेस न्युज | सांगली :
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून सांगलीतील एका महिलेला तब्बल 14 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही तक्रार कविता विनोद चव्हाण (रा. भार्गव रेसिडेन्सी, वखार भाग, सांगली) यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे.
तक्रारदार चव्हाण यांना संशयितांनी “एस. एस. मार्क ट्रेडिंग कंपनी” या नावाने संपर्क साधला. त्यांनी चव्हाण यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास हमखास जादा परतावा मिळेल, अशी हमी दिली. त्यांच्या या गोड बोलण्याला भुलून चव्हाण यांनी दहा लाख रुपयांचा चेक व चार लाख रुपये रोख स्वरूपात संशयितांकडे सुपूर्द केले.
गुंतवणुकीनंतर कंपनीकडून सुरुवातीला दरमहा 20 हजार रुपये परतावा चव्हाण यांना मिळू लागला. सलग चार महिने ही रक्कम मिळाल्याने त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. मात्र त्यानंतर परताव्याचे पैसे येणे थांबले.
आजअखेर तक्रारदार चव्हाण यांची तब्बल 13 लाख 20 हजार रुपयांची रक्कम कंपनीकडे अडकलेली आहे. या रकमेचा व मोबदल्याचा परतावा संशयितांकडून मिळाला नसल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाण्याचे धाव घेतली.
या प्रकरणी शहर पोलिसांनी खालील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे :
सचिन सिद्धनाथ रोकडे (रा. सांगलीवाडी)
मिलिंद बाळासाहेब गाडवे (रा. रतनशीनगर)
अविनाश बाळासाहेब पाटील (रा. उमळवाड, ता. शिरोळ)
हिरगोंडा बाबगोंडा पाटील (रा. मालगाव)
संशयितांनी महिलेला जादा नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर पोलिस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा तपास करीत असून संशयितांना अटक करण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे.
ही घटना शेअर मार्केटमधील फसवणुकीचे प्रमाण किती वाढले आहे, याचे आणखी एक उदाहरण मानले जात आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत परवानाधारक संस्था व बँकांमार्फतच व्यवहार करावेत, असा इशाराही पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.


