नाशिकमधून सरकारला धक्का : शेतकरी प्रश्नांवर पवारांची लढाऊ हाक

0
126

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नाशिक :
राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि वाढत चाललेलं कर्जाचं संकट या गंभीर प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे. नाशिकमध्ये सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चातून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारनं बघ्याची भूमिका घेतली आहे. पण आम्ही गप्प बसणार नाही. नाशिक ही तर सुरुवात आहे,” असा कठोर इशारा पवार यांनी यावेळी दिला.


मोर्चामध्ये बोलताना पवार म्हणाले,

  • “शेतकऱ्यांच्या संकटांवर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाडा हा आत्महत्यांचा सर्वाधिक बळी ठरला आहे.

  • कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सावकारांच्या जुलूमामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.”


शरद पवार यांनी स्वतःचा कृषीमंत्री म्हणूनचा अनुभवही सांगितला.
ते म्हणाले,
“मी कृषीमंत्री असताना आत्महत्येच्या घटना समोर आल्या. तेव्हा मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली होती की दिल्लीला बसून शेतकऱ्यांच्या समस्या कळणार नाहीत. जिल्ह्यांना भेट देणं आवश्यक आहे. आम्ही नागपूर, अमरावती, यवतमाळ येथे प्रत्यक्ष जाऊन शेतकरी कुटुंबांना भेटलो.
एका महिलेने मला सांगितलं – ‘सोसायटीचं कर्ज थकलं होतं, खासगी सावकाराचं कर्ज परतफेड झालं नव्हतं. सावकारानं घरातलं भांडे नेलं, आणि त्या अपमानानं माझ्या पतीनं आत्महत्या केली’.
हा अनुभव ऐकल्यावर मी ठरवलं की कर्जबाजारीपणा हा मोठा रोग आहे. त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही त्या काळात ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती.”


पवारांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले,
“शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात आहे. आत्महत्यांची मालिका थांबत नाही. पण सरकार या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहत नाही. आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बघ्याची भूमिका घेता येणार नाही. नाशिकचा मोर्चा ही तर केवळ सुरुवात आहे. पुढे हा आवाज राज्यभर उठेल.”


नाशिकमधील या आक्रोश मोर्चातून शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदान गाठलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी थेट सरकारला इशारा देऊन आगामी काळातील संघर्षाचा सूर लावला आहे. ग्रामीण भागात आत्महत्या, कर्जमाफी, पीकविमा आणि उत्पादन खर्चाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी येणार असल्याचे संकेत या मोर्चातून मिळाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here