पडळकरांचा शरद पवारांवर घणाघात: “कारस्थानाचा मुख्य कारखाना पवार”

0
420

माणदेश एक्सप्रेस न्युज | मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार टीका करताना त्यांना “महाराष्ट्रातील कटकारस्थानाचा कारखाना” असे संबोधले. पवार हे निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेबद्दल संशय निर्माण करून लोकशाही प्रक्रियेला गालबोट लावत असल्याचा आरोप करत पडळकरांनी त्यांच्या विरोधात तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.


पत्रकार परिषदेत बोलताना पडळकर म्हणाले,
“लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र असते. लोकांचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर मविआ नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत निवडणूक आयोगावर खोटे आरोप केले. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपयश आलं, तरी आम्ही कोणावर बोट न दाखवता आपल्या चुका सुधारल्या. परंतु विधानसभेत पराभवानंतर विरोधक हवेत होते, भ्रमात होते आणि अखेर त्यांनी ईव्हीएमवर दोषारोप सुरू केले.”


पडळकरांनी मारकडवाडीतील फेरमतदानाच्या मागणीचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं,
“त्या गावातील सरपंच आणि उपसरपंचांनीच सांगितले आहे की, गावकऱ्यांना पवारांच्या कार्यकर्त्यांनी पुढे करून आयोगावर आरोप करायला लावले. निवडणूक आयोगासारख्या जबाबदार संस्थेची बदनामी करण्यासाठी मुद्दाम कारस्थान रचलं गेलं. यावरूनच शरद पवार कारस्थान करतात हे उघड झालं.”

त्यांनी पुढे सांगितलं की, “या प्रकरणी शरद पवारांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”


पडळकरांनी पवारांना “आधुनिक नारदमुनी” संबोधत म्हटलं,
“पवार भांडणे लावतात, वाद निर्माण करतात. एका बाजूला मंडल यात्रा काढतात, तर दुसऱ्या बाजूला आपलेच लेक-नातू मराठा आरक्षणाची मागणी करतात. एकाचवेळी दुतोंडी भूमिका कशी घ्यायची हे त्यांच्याकडून शिकावं लागतं.”


पडळकरांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितलं की,
“निवडणुकीच्या काळात दोन माणसे भेटायला आली होती. त्यांचा प्लॅन पवारांनी समजून घेतला आणि त्यांना घेऊन राहुल गांधींना भेटले. इतकं सगळं माहिती असूनही पोलिसांना काहीच कळवलं नाही. अशा कारस्थानासाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.”


पडळकर म्हणाले, “मारकडवाडी गाव ९० टक्के धनगर समाजाचे आहे. या गावच्या सरपंच-उपसरपंचांनीच आता उघड केलं आहे की, पवारांच्या दबावामुळे गावकऱ्यांना आयोगावर आरोप करायला भाग पाडलं गेलं. यावरून पवारांच्या कारस्थानांना शिक्कामोर्तब झालं.”


गोपीचंद पडळकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांवर बोचरी टीका करत त्यांना महाराष्ट्रातील कटकारस्थानांचा कारखाना म्हटलं. मारकडवाडीतील सरपंचांच्या वक्तव्याचा आधार घेत निवडणूक आयोगाची बदनामी करणाऱ्या पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पवारांची दुतोंडी भूमिका, राहुल गांधींसोबतच्या बैठका आणि समाजात फूट पाडण्याचे डाव यांचा उल्लेख करत पडळकरांनी त्यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here