‘आज शरद पवार राष्ट्रपती होऊ शकले असते’, महायुतीमधील बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य

0
98

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार आमच्या सोबत आले असते तर या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचं स्वागतच आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

 

शरद पवार आमच्या सोबत आले असते तर ते या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचे स्वागतच आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते, आजही एकत्र आहेत. अजित पवारांचं म्हणणं एकच होतं, जर तुम्हाला शिवसेना चालते तर बीजेपी का चालत नाही? शरद पवार साहेबांसारखा माणूस आमच्या सोबत आला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं असतं. शरद पवार हे देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. अजूनही ती वेळ गेलेली नाही, शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचं स्वागतच आहे, असं आठवले यांनी म्हटलं.

 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे, त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना देखील एकत्र यावं लागेल. तरी मला अस वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. दोघांना एकत्रीत यायचं असेल तर त्यांनी यावं, पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here