शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संताप उसळला ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळाल्या नोटिसा

0
104

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :

सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हरकती प्रांताधिकाऱ्यांनी फेटाळल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. शासनाकडून मिळालेल्या नोटिसांची शेतकऱ्यांनी होळी करत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. “शक्तिपीठ महामार्ग तात्काळ रद्द करा” अशी एकमुखी मागणी करत शंखध्वनी आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.


महामार्ग रद्दसाठी अनेक दिवसांपासून लढा देत असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे हरकती दाखल केल्या होत्या. मात्र या सर्व हरकती प्रांताधिकारी यांनी फेटाळल्याचे आदेश शेतकऱ्यांना देण्यात आले. यामुळे आधीच नाराज असलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक झाला.


शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी मोठ्या संख्येने जमले. उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर यांच्या पुढाकाराने झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर संताप व्यक्त केला.


अखिल भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,
“शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा हेच सरकारचे धोरण आहे. मात्र, शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी आम्ही कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला बसू. जनतेला नको असलेला महामार्ग त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र लढा उभारू.”


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी म्हटले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे षडयंत्र रचत आहे. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. सरकारचे कारस्थान हाणून पाडले जाईल. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार थांबला नाही, तर जिल्ह्यातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील.”


नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले,
“राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याने शक्तिपीठ महामार्गाची मागणी केलेली नाही. नागरिकांमध्येही अशी कुठलीही मागणी नाही. फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी हा महामार्ग उभारला जात आहे. हजारो शेतकऱ्यांना भूमिहिन करून सरकार भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवत आहे. या अन्यायाचा उद्रेक अखेर हा महामार्ग हाणून पाडेल.”


या आंदोलनात प्रभाकर तोडकर, अजित हळीगले, विष्णू पाटील, उमेश एडके, अधिक पाटील, रघुनाथ पाटील, रवींद्र साळुंखे, नितीन झांबरे, सुनील पवार, विक्रम हारूगडे, राजाराम माळी, रमेश एडके, अधिक शिंदे, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राजू एडके, प्रमोद एडके, पांडुरंग मिसळ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आता अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटिसांची होळी करून त्यांनी शासनाला खुला इशारा दिला आहे. “शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला नाही, तर जिल्हा तीव्र आंदोलनाने पेटेल” असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here