
माणदेश एक्सप्रेस न्यूज | स्पोर्ट्स डेस्क :
आशिया कप 2025 हळूहळू निर्णायक टप्प्यात पोहोचत आहे. सुपर-4 फेरीच्या सामन्यांमुळे अंतिम फेरीत कोणता संघ उतरेल, याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारताला थेट उघड चॅलेंज दिलं आहे.
सध्या आशिया कपच्या सुपर-4 फेरीतून दोन संघ अंतिम फेरी गाठणार आहेत. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला आहे. अजून एक सामना जिंकला तर भारत अंतिम फेरीत आपली जागा निश्चित करेल. दुसरीकडे, पाकिस्तानलाही श्रीलंकेवर विजय मिळवल्याने आशा कायम आहे. पाकिस्तानचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होणार असून, त्यात विजय मिळवला तर ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
यामुळे चाहत्यांमध्ये भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने येतील का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी म्हणाला –
“टीम इंडिया अद्याप अंतिम फेरीत पोहोचलेली नाही. जर ते अंतिम फेरीत पोहोचले तर आम्ही त्यांना बघून घेऊ. आम्ही आशिया कप जिंकण्यासाठी आलो आहोत. कोणताही संघ अंतिम फेरीत पोहोचला तरी आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना पराभूत करू.”
आफ्रिदीच्या या वक्तव्यामुळे सामन्यापूर्वीच वातावरण तापलं आहे.
या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दोनदा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवली तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजांनी पाकिस्तानची वाट लावली. याच वेळी सूर्यकुमार यादवने पाकिस्तानवर टोला लगावत म्हटलं होतं की, “भारत आणि पाकिस्तानमध्ये कसली स्पर्धा? पाकिस्तान मागच्या काही वर्षांत सातत्याने हरतोय.”
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर सामना ऐतिहासिक ठरणार यात शंका नाही. पाकिस्तानसारख्या अनिश्चित खेळ करणाऱ्या संघाला पुन्हा पराभूत करणं भारतासाठी फार अवघड नसेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असल्याने भारतीय संघाला दक्ष राहून खेळावं लागेल.
भारताकडे सध्या दमदार फलंदाज, यष्टिरक्षक, अष्टपैलू खेळाडू आणि धारदार गोलंदाजांचा तगडा ताफा आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा पाकिस्तानचा पराभव होईलच, याबाबत भारतीय चाहत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
पाकिस्तानचं आव्हान अजून सुपर-4 फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बांगलादेशसारखा संघदेखील पाकिस्तानला पराभूत करण्याची ताकद ठेवतो. जर असं झालं तर भारत-पाकिस्तान अंतिम सामना रंगणार नाही.
आशिया कप अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान भिडले, तर हा सामना हायव्होल्टेज ड्रामापेक्षा कमी नसेल. शाहीन आफ्रिदीच्या उघड आव्हानामुळे सामन्याचा रंग अजून गडद झाला आहे. आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा सुपर-4 मधील उर्वरित सामन्यांकडे खिळल्या आहेत.