
माणदेश एक्सप्रेस/सांगोला : शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार शहाजी बापू पाटील हे त्यांच्या विधानामुळे कायमच चर्चेत असतात. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंडखोरी केली होती, तेव्हा त्यांच्याबरोबर शहाजी बापू पाटील हे देखील होते. तेव्हा गुवाहाटीतील एक डायलॉगमुळे शहाजी बापू पाटील चर्चेत आले होते. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल…’, त्यांचा हा डायलॉग राज्यभरात गाजला होता. यानंतर आता शहाजी बापू पाटील हे त्यांच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत.
माजी आमदार शहाजी बापू पाटील हे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वत:च्याच तोंडात मारून घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या कृतीने सभेत चांगलाच हशा पिकला होता. त्यांचा स्वत:च्याच तोंडात मारून घेतानाचा हा व्हिडीओही व्हायरल होत आहे. दरम्यान, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्वत:च्याच तोंडात मारून घेतलं तेव्हा व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह काही नेते देखील उपस्थित होते.
“ज्यांनी पाणी आडवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं. पण ज्यांनी तुम्हाला पाणी दिलं, त्यांना तुम्ही घरी बसवलं. त्यामुळे आपल्याला देखील काहीतरी वाटायला पाहिजे, आपल्या या चुकीमुळे आपण तोंडात मारून घ्यायला पाहिजे”, असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी भरसभेत स्वत:च्या तोंडात मारून घेतलं. शहाजी बापू पाटील यांच्या या कृतीवर सभेत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
सांगोल्यातील पाण्याच्या मुद्यावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की, “काय माणसं आहोत आपण? आपण काय केलं? ज्यांनी पाणी आडवलं त्यांना खासदार केलं आणि पाण्याशाठी ज्यांनी काम केलं, त्यांना घरी बसवलं. ही गोष्ट आपल्या काळजाला लागली”, असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील माढा लोकसभा मतदारसंघाचा संदर्भ दिला. यावरूनच शहाजी बापू पाटील यांनी हे भाष्य केलं. ‘तसेच आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. जनतेच्या विकासाची कामे करायची असतील तर सत्तेच्या जवळ असलं पाहिजे’, असंही मत शहाजी बापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.