
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आष्टा :
आष्टा शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी संशयित साजन नारायण औघडे (रा. आष्टा, डांगे कॉलेजजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण शहरात या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित मुलगी दि. 4 रोजी सकाळी आईसोबत घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर घर सोडून बाहेर पडली होती. ती शहरातील एका मंदिराजवळ बसून होती. दुपारी संशयित साजन औघडे दुचाकीवरून तिथे आला आणि त्याने मुलीला वाहनावर बसवून एका खोलीत नेले.
खोलीत नेताच आरोपीने मुलीला धमक्या देत जबरदस्ती केली. “मी सांगतो तसं केलं नाही तर बंदुकीने गोळ्या घालीन. मला तुझ्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती आहे, ते गावभर सांगून टाकीन,” असे म्हणत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर मुलगी रडत असताना, आरोपीने पुन्हा “तू कोणाला सांगितलेस तर तुला आणि घरच्यांना ठार मारीन,” अशी धमकी दिली. त्यानंतर तो मुलीला पुन्हा त्या मंदिराजवळ सोडून पळून गेला.
या बाबत पीडित मुलीच्या मावशीने आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून संशयित आरोपीचा अधिक तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीवर झालेला हा अत्याचार प्रकार शहरात चांगला चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी नागरिक व पालकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.