
माणदेश एक्सप्रेस न्यूज| मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू असतानाच, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकाच वेळी ताज हॉटेलमध्ये उपस्थिती आणि सुमारे ३० मिनिटांची बैठक ही महत्त्वाची ठरते. ही बैठक नेमकी कशाबाबत होती याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी राजकीय विश्लेषक याकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहत आहेत.
दरम्यान, आज दुपारी राज ठाकरे यांची मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा प्रभाव त्या बैठकीत दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील मनसेच्या भूमिकेमुळे महायुतीच्या काही उमेदवारांना फायदा झाला होता. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
राज ठाकरे जर महापालिकेत भाजपसोबत युती करणार असतील, तर मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील सत्तासमीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.