
माणदेश एक्सप्रेस न्यूज|कुपवाड : वटपौर्णिमेच्या रात्री कुपवाड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. विवाह झाल्यानंतर अवघ्या १८ दिवसांत नवविवाहितेने पतीचा कुऱ्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. अनिल तानाजी लोखंडे (वय ५३, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर, कुपवाड) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी राधिका अनिल लोखंडे (वय २७) हिला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल लोखंडे हे गवंडी काम करत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या दोन मुलींची लग्ने झाल्यानंतर ते एकटेच राहत होते. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी पुढाकार घेतला आणि साताऱ्याच्या वडी गावातील राधिकाशी २३ मे रोजी माधवनगर येथील मंदिरात विवाह लावण्यात आला. लग्नाच्या अगोदरच राधिकाला गर्भाशयाची समस्या असल्याने तिला मूलबाळ होणे शक्य नाही, हे अनिल व त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. तरीही दोघांचे विवाह नातेवाईकांच्या संमतीने झाले.
वटपौर्णिमेच्या दिवशी राधिकाला तिच्या मावस भावाकडे सोडण्यात आले होते. रात्री अनिल तिला परत घेण्यासाठी आले. घरी आल्यानंतर रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये शरीरसंबंधाच्या मुद्द्यावरून वाद झाला. राधिकाला त्याबाबत मनात भीती व नकार होता. ही भीती इतकी तीव्र होती की तिने झोपलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून जागीच ठार केले.
खून केल्यानंतर राधिकाने तिच्या मावस भावास फोन करून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर नातेवाईक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अनिल लोखंडे हे अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. शेजारीच रक्ताने माखलेली कुऱ्हाड होती. पोलिसांनी आरोपी राधिकेला अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी मिरज उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा व कुपवाड एमआयडीसीचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.