
लातूर/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून वाहणाऱ्या तिरू नदीपात्रात रविवारी (दि. २४ ऑगस्ट) सायंकाळी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. सापडलेला मृतदेह २५ ते ३० वयोगटातील तरुणीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, ही घटना खूनाची असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दुर्गंधीने उलगडला थरार
चाकूर तालुक्यातील शेळगाव शिवारातून तिरू नदी वाहते. या नदीवर चाकूर आणि वाढवणाला जोडणारा पूल आहे. रविवारी दुपारनंतर चार वाजेच्या सुमारास परिसरात अचानक दुर्गंधीचा उग्र वास येऊ लागला. शेतकऱ्यांनी याची दखल घेत पोलिसांना माहिती दिली.
वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि चाकूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी भंडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. झाडाझडती दरम्यान नदीकाठावर एक मोठी सुटकेस दिसली. सुटकेस उघडून पाहिले असता, त्यामध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. हे दृश्य बघून उपस्थित लोक हादरून गेले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह अधिकचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतला व तो शवविच्छेदनासाठी चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.
संशयित खूनाचा तपास सुरू
मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही तरुणी कोण? तिचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून नदीपात्रात का टाकला गेला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
पुलावरूनच मृतदेह असलेली सुटकेस नदीत फेकण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून या प्रकरणाचा तपास वेगाने करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
👉 संपूर्ण घटनेने लातूर जिल्हा हादरून गेला असून या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेसह पोलीस पथक करत आहेत.