
माणदेश एक्सप्रेस न्यूज| पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजवली असतानाच, हगवणे कुटुंबातीलच एक धक्कादायक बाजू समोर आली आहे. वैष्णवीची जाऊ आणि कुटुंबातील थोरली सून मयुरी जगताप हिनेही सासरच्या लोकांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. “मी डेअरिंग दाखवली नसती, तर आज जिवंत राहिले नसते,” असा स्पष्ट आणि थेट दावा तिने केला आहे.
मयुरी जगतापने माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, “वैष्णवी प्रमाणेच मलाही मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला होता. नणंद मला खायला देत नसे, किचनमध्ये मी गेले तरी तिचा पाठलाग करायची. आम्हा दोघांवर दीर आणि सासूचाही सतत छळ चालू होता. अखेर वेगळं राहण्याचा निर्णय आम्ही घेतला.”
तिने खुलासा केला की, “वैष्णवीला तिच्या नवऱ्याची साथ मिळाली नाही, म्हणून ती आज या जगात नाही. मी मात्र माझ्या नवऱ्याच्या मदतीमुळे या त्रासातून बाहेर पडू शकले.” वैष्णवीशी संपर्क झालेला असता तर ती तिची साथ दिली असती, असंही मयुरीने सांगितलं.
वैष्णवी शशांक हगवणेने आत्महत्या केल्यानंतर तिच्या घरच्यांनी सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार असून, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात आता हगवणे कुटुंबावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. मयुरीच्या धक्कादायक आरोपांमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून, हगवणे कुटुंबावरचा दबाव आणखी वाढला आहे.