टेकड्यांवर सुरक्षा अन् गस्त वाढविणार; चंद्रकांत पाटील म्हणाले….

0
153

माणदेश एक्सप्रेस/पुणे : ‘टेकड्यांवरील वणवे, सायंकाळनंतर फिरणारी जोडपी, अतिक्रमण आदी विषयांवर कडक लक्ष ठेवण्यात येईल. त्यासाठी वन विभागाला सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, वॉच टॉवर या गोष्टी पुरविण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी महापालिकेचीही मदत घेण्यात येईल. टेकडीवर सायंकाळनंतर गस्त घालण्यासाठी मनुष्यबळाची सोय केली जाईल. अतिक्रमण करणाऱ्यावर कडक कारवाई होईल,’ असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

 

वन विभागाच्या वन भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले आदी उपस्थित होते. म्हातोबा टेकडीवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साडेसहा हजार झाडे लावली होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये तिथे आग लागली आणि तेथील अडीच हजार झाडे होरपळून निघाली.

 

बैठकीनंतर पाटील म्हणाले, ’’म्हातोबा टेकडीवर आगीच्या तीन घटना घडल्या. त्यात अडीच हजार झाडांचे नुकसान झाले. त्यामुळे टेकड्यांवर सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा गार्ड नेमणे, चार वॉच टॉवर उभे करणे, गवत साचू न देणे, मशीनच्या साह्याने गवत काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यावर वन विभागासोबत बैठक झाली आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील.’’