शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर घेणार बदलापूर येथील पिडीत मुलींच्या पालकांची भेट; दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन

0
242

या लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणतात, ‘मी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका आणि ज्यांनी कारवाई सुरू केली त्या एनजीओ यांच्याशी बोललो. मी घडल्या प्रकरणाबाबत तपशीलवार माहिती गोळा केली. त्यानंतर आरोपीवरील कारवाईबाबत मी आंदोलकांच्या समोर माहिती देणार होतो, मात्र यावेळी आंदोलनस्थळी कोणीतरी बाटली फेकली आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही.

उद्या मी आंदोलकांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करेन. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यास विलंब केल्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही आरोपी ठरवण्यात येईल. मुलीचे पालक आज बोलू शकेल नाहीत, त्यांना मी सार्वजनिकरित्या भेटू शकत नाही. जर ते उद्या ठीक असतील तर मी त्यांना उद्या संध्याकाळी भेटण्याचा प्रयत्न करेन,’

बदलापूर येथे शालेय अल्पवयीन मुलींच्या बाबतीत झालेली घटना अत्यंत दुर्देवी घटना असून ही घटना ज्या शाळेत घडली आहे त्या शाळेची आणि शाळेशी संबंधितांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक व बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष करीत आहेत. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.