
माणदेश एक्सप्रेस न्युज | कुंडल :
सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या एका तरुणाने पोलिसांना मेल पाठवून आपल्या यातना व्यक्त केल्या आणि त्यानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. घोगाव (ता. पलूस) येथील महेश मोहन चव्हाण (४४) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूपूर्वीच्या मेलमुळे सावकारीचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या मेलच्या आधारे सहा सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कुंडल पोलिसांनी सचिन संपत आवटे, दिलीप मारुती आवटे, तुषार शंकर चव्हाण, बब्बर लाड, अक्षय गरदंडे व प्रदीप संपत देशमुख या सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मृत महेश चव्हाण याने व्यवसायासाठी या सावकारांकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून त्याच्याकडून पैशांची अवास्तव मागणी सुरू होती. सात ते आठ लाख रुपये व्याजापोटी मागणी करण्यात येत होती, अशी फिर्याद आहे.
या पैशाच्या वसुलीचे काम प्रामुख्याने अक्षय गरदंडे याच्याकडून केले जात होते. त्याने वारंवार फोन करून धमक्या दिल्या, अशी स्पष्ट नोंद मृतकाने आत्महत्येपूर्वी पोलिसांना पाठविलेल्या मेलमध्ये केली आहे.
या घटनेनंतर महेशचे नातेवाईक हवालदिल झाले असून, मोहन यशवंत चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ग्रामीण भागात सावकारीच्या जाळ्यात अडकून अनेक जण आपले आयुष्य संपवतात. शासनाने महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ लागू करून बेकायदेशीर सावकारी थांबविण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात ही सावकारी ग्रामीण पातळीवर अजूनही सुरूच आहे. महेश चव्हाण यांची आत्महत्या हा त्याचाच आणखी एक बळी ठरला आहे.