
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सातारा :
सातार्यातील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात एका महिलेने एकाच वेळी चार अपत्यांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयात तब्बल दहा वर्षांनंतर घडलेली ही दुर्मिळ आणि गौरवशाली घटना ठरली असून, आई व चारही बाळे सुखरूप असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिलेने प्रथम मुलगी, नंतर मुलगा आणि त्यानंतर दोन मुलींना जन्म दिला. चारही बाळांचे अनुक्रमे वजन ११००, १२००, १३०० व १६०० ग्रॅम इतके आहे. जरी ही प्रसूती जोखमीची होती, तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे ती यशस्वी झाली. सध्या आई व बाळांची प्रकृती उत्तम असून वैद्यकीय टीम सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
सदर महिला तिसऱ्यांदा गर्भार होती. पहिल्या गर्भधारणेत तिला जुळी मुले झाली होती—एक मुलगा आणि एक मुलगी. दुसऱ्या वेळी तिने एका मुलीला जन्म दिला होता. आता तिसऱ्या वेळेस एकाच वेळी चार बाळांचा जन्म झाल्याने तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
या यशस्वी प्रसूतीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मेजर डॉ. राहुलदेव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सदाशिव देसाई, डॉ. तुषार मसराम (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. नीलम कदम आणि डॉ. दिपाली राठोड पाटील यांनी परिश्रम घेतले. अधिपरिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
काही कुटुंबांमध्ये जनुकीय रचनेमुळे जुळी मुले होण्याची प्रवृत्ती दिसून येते. या कुटुंबाच्या इतिहासात याआधी देखील जुळी मुले जन्माला आलेली होती. मात्र, या वेळी महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म देऊन एक दुर्मिळ घटना घडवली आहे.
जिल्हा रुग्णालयात ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा विश्वास असल्याचे डॉ. करपे यांनी सांगितले. “गर्भवती महिलांची तपासणी व उपचार पद्धतशीररीत्या होत असल्याने अनेक गुंतागुंतीचे प्रसंग देखील यशस्वीरीत्या हाताळले जातात,” असे ते म्हणाले.
या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षमतेचे व गुणवत्तेचे उत्तम उदाहरण समोर आले असून, साताऱ्यातील नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.


